मोटारीस धडकून दुचाकीस्वार बसखाली सापडले..
भिलवडी : वार्ताहर
भिलवडी (ता. पलूस) येथे तिहेरी अपघातात बसचे चाक डोक्यावरून गेल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. सुखदेव तानाजी गेजगे (वय २०) व प्रयास केशव सकटे (वय १५, दोघेही रा. साठेनगर, माळवाडी, ता. पलूस) अशी मृतांची नावे आहेत.
रविवार, दि. १२ रोजी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. भिलवडी येथील सेकंडरी स्कूलसमोर खासगी प्रवासी वाहतूक करणारी मोटार (एमएच १० के ५९२) अचानक रस्त्यावर थांबली. या मोटारीस पाठीमागून येणारी दुचाकी (एमएच १० इएल २७९६) धडकली. त्यामुळे या दुचाकीवरील सुखदेव आणि प्रयास रस्त्यावर पडले. त्याचवेळी बाजूने जोतिबा-तासगाव बस (एमएच १४ बीटी ६१०) जात होती. अचानक दोघे दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने या बसचे मागील चाक दोघांच्याही अंगावरून गेले व जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळाचे दृश्य हृदय हेलावणारे होते. पोलिसांनी बसचालक अनिल मारुती माळी (वय ५४, रा. पानमळावाडी, ता. तासगाव) व मोटारचालक अमित काकडे (रा. सांगली) यांना ताब्यात घेतले आहे. नागरिकांनी दोघांनाही सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. प्राची केशव सकटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भिलवडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. सहायक निरीक्षक भगवान पालवे अधिक तपास करत आहेत.

No comments:
Post a Comment